Thursday, February 24, 2011

ऑस्करची चालुगीरी


मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा २७ फेब्रुवारीला आहे. पारदर्शक कारभार असुन सुद्धा काही वाद या पुरस्कार सोहळ्याला चिकटले आहेत. ऑस्करवर असलेले काही गंभीर आरोप:

ऑस्करला निग्रोंचं वावडं
ऑस्करला आणि एकुणच अमेरिकेला निग्रोंचं वावड आहे. हॅथी मॅक-डेनियल आणि हॅले बेरी असे अपवाद सोडले तर ऑस्कर मधे काळ्यांना स्थान नाहीये.

ऑस्करच्या बेस्ट ऍक्ट्रेसचा डिवोर्स
१९३६ ते २०१० पर्यंतच्या ७५१ बेस्ट ऍक्ट्रेस नॉमिनी झाल्यात. त्यातल्या बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार मिळालेल्या ६३% ऍक्ट्रेसचा डीवोर्स झालेला आहे. उदा. सॅड्रा बुलक, हिलरी स्वॅंक, केट विन्स्लेट, ज्युलिया रॉबर्ट्स, हॅले बेरी.

ऑस्कर अमेरिका धार्जिणी
अमेरिका विरोधी असलेला चित्रपट नॉमिनेशन पर्यंत जातो. पण चित्रपटाचं कितीही कौतुक झालेलं असो, बॉक्स-ऑफिस वर पिक्चर हिट असो, जर चित्रपटात अमेरिकेच्या विरोधात काही असेल तर तो ऑस्कर मधुन बाद होतो. उदा. गॅंग्स ऑफ न्युयॉर्क, शिकागो, अवतार.

ऑस्करला लठ्ठ लोकांचं वावडं
लठ्ठ लोकांना ऑस्कर मिळत नाही, एक मॉनिक्युचा अपवाद सोडला तर.

ऑस्करला कुरुपपणाचं आकर्षण
नॉन गॅमरस लुक असलेले चित्रपट, गरीबी / दारिद्र दाखवणारे चित्रपट, गलिच्छ वातावरण, भुक आणि असेच विषय असलेले चित्रपट ऑस्कर ज्युरीला आवडतात. उदा. स्लमडॉग मिलेनियम.

Sunday, February 20, 2011

माझं गल्ली क्रिकेट


झुऽऽऽऽऽऽम.. चला माझ्या लहानपणात.

लहानपणी क्रिकेट खेळायचं म्हणजे बॅटवाल्या मित्राला धरुन आणायचं. बॉल स्वस्त असल्याने सहसा कुणाकडेही सापडायचा. गावाकडे प्रत्येकाकडे सायकल असायच्याच, त्यांचा स्टंप म्हणुन उपयोग व्हायचा.

ऍक्चुअली.. खरं तर... क्रिकेट हा बेसिकली तीन जणांचा खेळ आहे. बॅट्समन, बॉलर आणि फील्डर. बास्स.

पण राजकारणात कसं मंत्रांची संख्या वाढून जंबो मंत्रीमंडळ तयार करता येतं तसचं गल्ली क्रिकेट मधे पोरं जास्त वाढली तर त्या प्रमाणात जागा बनवता येतात. मग त्यांना विकेट किपर किंवा तत्सम ठीकाणी पेरायचं.

गल्ली क्रिकेटचे नियमही भन्नाट असायचे.
सरपट्टी किंवा टप्पा चेंडु टाकायचा नाही. कारण काय तर गल्लीतल्या मुली येता-जातांना बघतात. त्यामुळे बायल्या बॉलींग करायची नाही.
जर कोणाच्या गच्चीवर बॉल गेला तर आउट कारण बॉल जप्त व्हायचा. त्यामुळे जोरात बॉल मारायचा नाही.
बगिच्यात बॉल गेला तर बॅट्समनने तो स्वत: जाउन आणायचा.
विकेट किपर नसेल तर हुकलेला बॉल बॅटिंग करणारा आणेल. पण जर या गोष्टीचा फायदा घेउन बॉलर ने जास्त वाईड बॉल टाकला तर तो बॉल बॉलर आणणार.
मुलींना खेळात नो-एंट्री.
एखाद्याची लाईन जर येत असेल तर त्याला खास दोन मिनीटांसाठी (तीच्या समोर म्हणुन) बॅटींग दिली जायची.

कधीकधी मग मोठ्या मुलांसोबत मोकळ्या मैदानावर अर्थात ग्राउंडवर जायचो. ग्राउंडची जमीन टणक असल्यामुळे स्टंप ’गाडायच्या’ जागेवर मुत्राभिषेक करुन जागा नरम करण्यात यायची. बॅट्समनच्या साईड्ला तिन स्टंप आणि बॉलरच्या साईडला एक स्टंप असायचा.

ईथे मात्र बिनधास्त क्रिकेट खेळले जायचे. या बिनधास्त क्रिकेट मुळे अनेकांना नाजुक स्थळी बॉल लागून मरणयातना भोगाव्या लागल्या आहेत.  ईथेच मला कळले कि मी बॉलर म्हणुन जास्त ’फिट’ आहे.

पण काहीही असो... मारामारी.. भांडणं.. ग्रुप्स... आणि क्रिकेट संपल्यावर हात न धुता खाल्लेला वडापाव.. मजा यायची.

आता मात्र मी पोराला चकाचक मॉलला नेतो, पन्नास रुपयात अर्धातास बॅटींग करायला. बॉलींग एक मशीन करतं. आणि फील्डींग साठी नेट लावलेली असते. मॉलच्या दुनियेत आता क्रिकेट हा एकट्याचा खेळ झाला आहे.

प्रगतीच म्हणायची... दुसरं काय??